Video: साईनाथ मंडळ ट्रस्ट व श्री त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ ट्रस्टच्या वतीने नृत्याविष्काराचे आयोजन…

natarang-acadamy

पुणे (पियूष शहा) : भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जनतेसमोर यावा, वारशाचे जतन व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवार पेठेतील सुमारे 300 वर्षे जुन्या श्री त्रिशुंड गणपती मंदिराच्या प्रांगणात नटरंग अकॅडमीच्या युवा कलाकारांनी सोमवारी (ता. 28) भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर केला.

29 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ ट्रस्ट यांनी संयुक्त विद्यामाने या नृत्याविष्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची संकल्पना साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांची होती. ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू स्वाती दातार, शाहीर हेमंत मावळे यांची विशेष प्रमुख उपस्थिती होती.

नटरंग ॲकॅडमीच्या प्रणव कडेकर यांनी त्रिपुंड नृत्य आविष्काराचे नृत्य दिग्दर्शन केले होते तसेच वैष्णवी गोकुळे, तनया पांडे, पावनी पवार, श्रुती पासलकर, पूर्वा भागवत, जान्हवी शिंदे, गणेश कांबळे, आयुष केदारी यांनी नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्रिपुंड या नृत्याविष्कारानंतर शिवपार्वती आलारिपू सादर करून वृंदावनी वेणू या अभंगावर नृत्याविष्कार सादर करण्यात आला.

उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. स्वाती दातार म्हणाल्या, समर्पण भावनेतून कलाकार कला सादर करतात तर रसिक कलेला मोठे करतात. पूर्वीच्या काळी मंदिरांमध्येच कलांचे सादरीकरण व्हायचे. ही परंपरा येथे सुरू झाल्याचा आनंद आहे. नृत्याच्या क्षेत्रात 40 वर्षे योगदान दिल्याबद्दल डॉ. दातार यांचा शाहीर मावळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

समृद्ध वारसा असलेल्या मंदिराच्या प्रांगणात भारतीय नृत्यकला सादर केली जावी आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन केले जावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पियूष शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पुणे शहरातील गणपती मंडळांना पुस्तक व वेबसाईटसाठी माहिती देण्याचे आवाहन!

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गणपती मंडळांची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया 0

No comments yet.