श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

shrimant-bhausaheb-rangari ganapati

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने गेल्या १३२ वर्षात लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे स्वतंत्र चळवळीतील योगदान निश्चितपणे समाजाला प्रेरणादायी ठरत आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश रुपी राक्षसांचा वध असा प्रतीकात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवला गेला आणि सध्य स्थितीला समाजातील वाईट अपप्रवृत्तींचा संहार असा क्रांतिकारी संदेश आपल्याला श्रींच्या मूर्तीतून मिळतो. हि गणेश मूर्ती स्वतः श्रीमंत भाऊसाहेबांनी आपल्या स्वहस्ते कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे. आजही तीच मूर्ती आणि मिरवणुकीचा तोच सागवानी लाकडी रथ गेली १३२ वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवात दिमाखदार स्वरूपात आपणास पाहावयास मिळतो.

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ ज्या वास्तूत रोवली गेली आणि हिंदुस्थानाच्या सामाजिक जीवनात लोकचळवळीचा नवा अध्याय ज्या वास्तूच्या साक्षीने रचला गेला ती वास्तू म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा राहता वाडा. क्रांतिकारकांचे माहेरघर असणारी हि वास्तू म्हणजे भारतीय वास्तू कलेचा उत्तम नमूना.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची पुणे महापालिकेकडून ‘ऐतिहासिक वारसा स्थळ’ म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या बरोबर महापालिकेच्या हेरीटेज वॉकमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटीश राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्यासाठी सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना मांडली होती. त्यानुसार पुण्यात 1892 मध्ये रंगारी यांनी तीन गणपती बसवले. त्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश होता. पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन हे या गणपती ट्रस्टचे विद्यमान उत्सव प्रमुख आणि विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे उत्सवप्रमुख पदाची जबाबदारी आल्यापासून दरवर्षी ट्रस्टच्या माध्यमातून गणेशोत्सवात विविध उपक्रम राबविले जात आहेत.

प्रतिक्रिया 0

No comments yet.