मानाचा पहिला गणपती: कसबा गणपती

kasba-ganpati

पुण्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे. शनिवारवाड्याच्या जवळ शहराच्या मध्यवस्तीत कसबा पेठ येथे कसबा गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला १४०० वर्षांचा इतिहास आहे. विशेष बाब म्हणजे कसबा गणपतीची ही मूर्ती तांदळा स्वरूपात आहे. तांदळा स्वरूप म्हणजे ही मूर्ती घडवण्यात येत नाही. आठवड्यातून दोन वेळा या मूर्तीला शेंदूरलेपन केले जाते. या गणपतीच्या डोळ्यांत हिरे आहेत. ही मूर्ती स्वयंभू असून, साडेतीन फूट उंचीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, असे म्हटले जाते.

१६३६ मध्ये जेव्हा शहाजीराजांनी लाल महाल बांधला तेव्हा त्याच्या बाजूलाच जिजामातांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. १८९३ साली कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ कसबा गणपतीपासूनच होतो. पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते.

प्रतिक्रिया 0

No comments yet.